भुसावळमधील हत्याकांड पाण्याच्या टँकरवरून झालेल्या वादातून ? दोन जण पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव टुडे । जिल्ह्यातील भुसावळ शहरात बुधवारी (ता.29) रात्री दहाच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे तसेच सामाजिक कार्यकर्ता सुनील राखुंडे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. सदरचे हत्याकांड हे पाण्याच्या टँकरवरून झालेल्या वादातून घडल्याची फिर्याद मयताचा भाऊ मिथून बारसे याने पोलिसात दिली आहे. त्यानुसार भुसावळ शहर पोलिस ठाण्यात आठ ते दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. (Crime News)

भुसावळ शहरातील नवीन सातारा भागातील मरीमाता मंदिराजवळ सदरची गोळीबाराची घटना घडल्यानंतर संबंधित सर्व मारेकरी फरार होण्यात यशस्वी झाले होते. दरम्यान, तणावाची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली होती. तपासाची चक्रे गतीमान करून पोलिसांकडून हत्याकांडातील मारेकऱ्यांचा कसून शोध घेतला जात असताना, मयताचा लहान भाऊ मिथुन बारसे याने गुरुवारी (ता.30) दिलेल्या फिर्यादीनुसार माजी नगरसेवक राजू सुर्यवंशी तसेच शिव पथरोड, विष्णू पथरोड, विनोद चावरिया, सोनू पंडीत, करन पथरोड, नितीन पथरोड, बंटी पथरोड यांच्यासह अन्य काही अनोळखी इसमांच्या विरोधात भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपींपैकी राजू सूर्यवंशी तसेच विनोद चावरिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

हत्याकांडात मयत झालेले माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर गुरूवारी भुसावळ येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button