मालेगावमध्ये मध्यरात्रीचा थरार…माजी महापौरांवर पाच फुटांवरून झाडल्या गोळ्या !
जळगाव टुडे । काहीना काही कारणांवरून आतून सतत धुमसणाऱ्या मालेगावमध्ये सोमवारी (ता.27) मध्यरात्री गोळीबाराची खळबळजनक घटना घडली. माजी महापौर अब्दुल मलिक यूनूस इसा यांच्यावर फक्त पाच फुटांवरून अज्ञात दोन हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या असून, त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. मलिक यांच्यावर आता नाशिकच्या एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मलिक यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (Crime News)
एमआयएमचे माजी महानगर प्रमुख असलेले अब्दुल मालिक हे सोमवारी रात्री जमीन व्यवहाराच्या खासगी कामासाठी मालेगावातील आयशानगर भागात गेले होते. काम संपल्यानंतर दुचाकीने घरी जात असताना ते माजी नगरसेवक रहेमान शाह यांच्या जुन्या आग्रा रस्त्यावरील दुकानाजवळ थांबले. त्याठिकाणी खुर्च्यांवर बसून त्यांची चर्चा सुरू असतानाच अचानक दोन संशयित भरधाव दुचाकीवरून आले. काही कळायच्या आत त्यांनी अब्दुल मालिक यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी मलिक यांच्या डाव्या हातात, दुसरी पायात घुसली आणि तिसरी पोटाला चाटून गेली. मालिक खाली कोसळल्यानंतर दोन्ही हल्लेखोर आलेल्या दुचाकीवरून फरार झाले. रहेमान शाह आणि त्यांच्या सोबत असलेल्या अन्य सहकाऱ्यांनी मालिक यांना तात्काळ मालेगावातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्याचा सल्ला देण्यात आला. अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती तसेच सहायक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.