शिंदखेडा तालुक्याला केमिकलयुक्त ताडीची झिंग; नशेसाठी चाललाय जिवाशी खेळ !
जळगाव टुडे । धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील काही गावात राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादाने सर्रास केमिकलयुक्त ताडीची खुलेआम विक्री सुरू आहे. ‘क्लोरल हायड्रेट’ केमिकलपासून तयार केल्या जाणाऱ्या शरीराला घातक ताडीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून, कोणाचाही वचक न राहिल्याने या ताडीची खेडोपाडी मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. (Crime News)
पूर्वीच्या काळी नदीच्या काठावरील गावामध्ये ताडीची झाडे मोठ्या संख्येने दिसून यायची. शिंदखेडा तालुक्यातील दिवी, रेवाडी, खर्दे, वरझडी आदी गावांमध्येही कधीकाळी ताडीच्या झाडांची मोठी वनराई अस्तित्वात होती. काळाच्या ओघात बोटावर मोजता येतील एवढीच झाडे सध्या तग धरून उभी आहेत. त्यानंतर देखील शिंदखेडा तालुक्यात सध्या शेकडो लिटर्स ताडीचे उत्पादन होते तरी कुठुन, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
प्राप्त माहितीनुसार, क्लोरल हायड्रेट हा एक नशा आणणारा मादक पदार्थ आहे. नशा निर्माण करणारी पांढरी पावडर म्हणून तसेच गुंगीचे औषध म्हणून सुद्धा ते ओळखले जाते. क्लोरल हायड्रेटचे वारंवार सेवन केल्यास त्याचे मोठ्या प्रमाणावर शरीरारावर दुष्परिणाम जाणवतात, हे माहिती असुनही ताडी तयार करण्यासाठी त्याचा सगळीकडे सध्या वापर सुरू आहे. शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये केमिकल मिश्रित ताडीची विक्री जोरात सुरू आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून क्लोरल हायड्रेट ही पावडर छुप्या मार्गाने आणली जाते. केमिकलच्या एका छोट्या बाटलीची किंमत 25 रुपये एवढीच असते. मात्र, तिच्यापासून मोठे ड्रम भरून ताडी तयार केली जाते, अशी माहिती मिळाली आहे.