जळगावच्या सौरभ ज्वेलर्समध्ये दरोडा; कामावरील माणसानेच दिली होती टीप !
जळगाव टुडे । शहरातील सराफ बाजारात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सौरभ ज्वेलर्समध्ये 20 मे रोजी पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी चाकूचा धाक दाखवत धाडसी दरोडा टाकला होता. सुमारे 32 लाखांचा मुद्देमाल लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या शोधार्थ एलसीबी तसेच शनिपेठ पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केल्यानंतर आतापर्यंत सहा संशयितांना जेरबंद करण्यात यश देखील आले आहे. Crime News
सौरभ ज्वेलर्समध्ये टाकण्यात आलेल्या धाडसी दरोड्यातील संशयित आरोपींची संख्या सहापर्यंत पोहोचल्यानंतर सदरचा दरोडा हा हद्दपार आरोपी सोनू सारवान याने रचल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान, सौरभ ज्वेलर्समध्ये तीन वर्षांपूर्वी कामावर असलेल्या माणसाने आतील सर्व इत्यंभूत माहिती पुरविल्याचेही तपासातून समोर आले असून, रितेश संतोष आसेरी असे त्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीवरूनच सदरचा दरोड टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयित दरोडेखोरांकडून सुमारे 1 लाख 20 हजार रूपयांची चांदी ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच दरोड्याच्या गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी देखील जप्त केल्या आहेत. सोन्याचा तपास अद्याप लागलेला नाही. अटकेतील आरोपींचा अन्य चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यातही संबंध असल्याची माहिती पोलिसांना तपासातून मिळाली आहे. त्यात धुळ्यातील सुमारे सव्वा कोटी रूपयांच्या दरोड्याचा देखील समावेश आहे. दरोड्यातील प्रमुख संशयित आरोपी सोनू सारवान याच्या नावावर यापूर्वी तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत. सध्या तो हद्दपार असुनही जळगाव शहरात बिनधास्तपणे फिरत होता.