जळगावच्या सौरभ ज्वेलर्समध्ये 32 लाखांचा दरोडा; पुण्यातून एका संशयिताला अटक
जळगाव टुडे । शहरातील सराफ बाजारात असलेल्या सौरभ ज्वेलर्समध्ये सोमवारी (ता.20) पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी चाकूचा धाक दाखवत धाडसी दरोडा टाकला होता. सुमारे 32 लाखांचा मुद्देमाल लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या शोधार्थ एलसीबी तसेच शनिपेठ पोलिसांकडून तपासाची चक्रे गतीमान करण्यात आली होती. दरम्यान, पुण्यातून एका संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून अन्य साथीदार तसेच मुद्देमालाची माहिती काढण्याचा प्रयत्न चौकशीतून केला जात आहे. ( Crime News)
जळगावच्या सराफ बाजारात महेंद्र कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी पहाटे चार ते साडेचार वाजता तीन दुचाकींवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञात सहा लुटारूंनी मुख्य चॅनेल गेटचे व दरवाजाचे कुलूप कटरने कापले. त्यानंतर आतमध्ये प्रवेश केला व लाकडी दरवाजाच्या छोट्या खिडकीतून ते आतमध्ये गेले. दुकानाच्या आतमध्ये आधीच दोन जण झोपलेले होते. सर्व सहा दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत त्यांना शांत राहण्याविषयी सांगून आपला कार्यभाग साधला होता. त्यानंतर 25 लाख 47 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने, 06 लाख 50 हजार रूपयांची चांदी आणि 32 हजार रूपयांची रोख रक्कम, असा सुमारे सुमारे 32 लाखांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता.
दरोड्याच्या घटनेनंतर संशयित आरोपींचे लोकेशन व अन्य तांत्रिक बाबी तपासून पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना झाले होते. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, जळगाव शहरातूनही अन्य दोघांना उचलले आहे. ताब्यातील सर्व संशयितांची पोलिस आता कसून चौकशी करत आहेत. जळगावच्या सराफ बाजारात यापूर्वी देखील काही दरोड्याच्या घटना घडल्या होत्या. त्यांच्याशी संशयितांचा काही संबंध आहे का, याचाही तपास एलसीबी व शनिपेठ पोलिसांकडून करण्यात येत आहे.