नवाब मलिकांसोबत नाव गोवण्याची धमकी देऊन जळगावच्या डॉक्टरला १९ लाख रुपयांना गंडवले

जळगाव टुडे । माजी मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. तुमचेही नाव त्यात येत आहे, त्यात तुमचा सहभाग आहे. तुम्हाला ईडीची नोटीस देखील येणार आहे. ईडीच्या कचाट्यातून वाचायचे असल्यास आम्ही सांगू तेवढे पैसे पाठवा, अशी बतावणी करून जळगावच्या एका पॅथॉलॉजी डॉक्टरांची सुमारे १९ लाख २० हजार रुपयांत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Crime News)

जळगाव शहरात पॅथॉलॉजी लॅब चालवणाऱ्या एका डॉक्टरला १ मे रोजी अंकुश वर्मा याच्या ९२०५७१६८६८ या मोबाइलवरून फोन तसेच ९८६४६१८२३८ या क्रमांकावरून एसआय सुनीलकुमार मिश्रा याने व्हाटसऍप चॅट व व्हिडिओ कॉल केले. लखनऊ पोलिसातून बोलत असल्याचे सांगून डॉक्टरला माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचा सहभाग समोर येत आहे. त्यातून वाचायचे असल्यास आम्हाला पैसे पाठवा, असे सांगून धमकावण्यात आले. त्यानुसार डॉक्टरांनी समोरच्या व्यक्तींना आधी ५ लाख रूपये पाठवले. त्यानंतर डॉक्टरांकडे पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली, असे ७ वेळा डॉक्टरकडून १८ मे पर्यंत सुमारे १९ लाख २० हजार रूपये भामट्यांनी ऑनलाइन स्वीकारले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर डॉक्टरांनी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button