पुण्यात मध्यरात्रीचा थरार…मद्यधुंद अल्पवयीन बिल्डर पुत्राच्या कारने दोघांना चिरडले !
जळगाव टुडे । पुणे शहरातील कल्याणीनगर भागात पबमधून रात्री उशिरा घरी परतणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने अलिशान कार वेगाने चालवून दुचाकीवरील तरुण-तरुणीला चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिष अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, अपघातानंतर फरार होण्याच्या तयारीत असलेल्या मुलाला नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले असून, तो शहरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. ( Crime News)
रात्री अडीच वाजेच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीवरील तरूण व तरूणीला धडक दिल्यानंतर मोठा आवाज झाला. तरुण-तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. तरुण गंभीर जखमी झाल्याने तडफडत होता, तर तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. अल्पवयीन आरोपी चालवत असलेल्या पोर्शे गाडीतील चारही एअर बॅग उघडल्या होत्या. आजुबाजुचे नागरिक घटनास्थळी गेले, तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे त्यांना आढळून आले. तसेच त्याच्या गाडीत अन्य तीन जण असल्याचेही दिसले.
दरम्यान, भादंवि 304 (अ)(अ) नुसार निष्काळजीपणे गाडी चालवण्यास पालकास दोषी धरण्यात येते. वडिलांची गाडी मुलगा जरी चालवत असला तरी संबंधित चारचाकी वाहनाची कायदेशीर कस्टडी ही पालकांचीच नवीन वाहन कायद्यात ग्राह्य धरलेली आहे. त्यानुसार संबंधित मुलाच्या पालकावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे. आता पोलिस काय भूमिका घेतात, त्याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.