रामदेववाडीतील चौघांचा जीव घेणारा कारचालक 13 दिवसांपासून आहे फरार !

राजकारण्यांवर प्रकरण दडपण्याचा आरोप

जळगाव टुडे । धनदांडग्यांची मुले चालवित असलेल्या भरधाव कारने उडवल्याने रामदेववाडी (ता.जळगाव) येथे एका महिलेसह तिची दोन मुले आणि भाच्याचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना 07 मे रोजी घडली होती. संबंधित कारचालकावर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला असला, तरी पोलिसांना 13 दिवस उलटले तरी त्याचा शोध घेता आलेला नाही. दरम्यान, सदरचे प्रकरण जिल्ह्यातील राजकारण्यांकडून दडपले जात असल्याचा आरोप रामदेववाडीच्या ग्रामस्थांनी केला आहे. (Crime News)

राजेश अलसिंग चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, रामदेववाडी नजीक चौघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या कारमध्ये जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांचा मुलगा अखिलेश तसेच शासकीय कंत्राटदार अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल हा देखील होता. परंतु, पोलिसांनी फक्त कार चालकावर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अन्य दोघांवर कोणताच गुन्हा दाखल केलेला नाही. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांसह रामदेववाडीच्या ग्रामस्थांनी त्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यास त्यावेळी नकार सुद्धा दिला होता. परंतु, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः सर्वांची समजूत काढल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती. प्रत्यक्षात दोषींवर कारवाईसाठी नंतर कोणतीच हालचाल न झाल्याने रामदेववाडीच्या ग्रामस्थांनी पोलिस व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेवटी 13 मे रोजी थेट लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतरही ढीम्म पोलिस प्रशासनाला कारचालकाचा साधा शोध आतापर्यंत घेता आलेला नाही. त्यामुळे रामदेववाडीतील ग्रामस्थांमध्ये संतापाची तीव्र लाट पसरली आहे.

पोलिसांच्या भूमिकेवरच आता संशय
रामदेववाडीतील आईसह तिचे दोन्ही मुले आणि भाच्याच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या कारमध्ये बसलेले अखिलेश पवार आणि अर्णव कौल यांच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या दोघांच्या चौकशीत आणि कारवाईत दिरंगाई करण्याची एक चांगली संधी सापडल्याचा आरोप होऊ लागला आहे. एकूण सर्व प्रकार लक्षात घेता पोलिसांच्या भूमिकेवरच त्यामुळे आता संशय घेतला जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button