जळगाव पोलिसांनी प्रेम प्रकरणातून रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या युवकाचे वाचविले प्राण

Crime News : छत्रपती संभाजीनगरातील मूळ रहिवासी असलेला तरूण जळगाव शहरातील एका तरूणीच्या प्रेमात पडला होता. संबंधित तरूणीने अचानक बोलणे बंद केल्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी आलेल्या त्या तरूणाने पिंप्राळा रेल्वेगेटजवळ आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याने स्वतः 112 नंबर डायल करून माहिती दिल्याने शहर पोलिसांनी वेळीच त्याचे प्राण वाचविले.

छत्रपती संभाजीनगरातील रहिवासी असलेल्या तरूणाचा फोन चुकून जळगावच्या तरूणीला लागला होता. त्यातून त्यांच्यात संवाद वाढला व त्याचे प्रेमात रूपांतर झाले. साधारण सहा वर्ष त्यांचे प्रेम प्रकरण चालू असताना, तरूणीने त्याच्याशी अचानक बोलणे बंद केले. त्यामुळे निराश झालेल्या तरूणाने तरूणीच्या शोधासाठी अखेर जळगाव गाठले. परंतु, त्यास तरूणी काही सापडली नाही. त्यामुळे त्याने जीवन संपविण्याच्या उद्देशाने पिंप्राळा रेल्वेगेट गाठले. तिथे काहीवेळ रेल्वेगाडी येण्याची वाट त्याने पाहिली. बराच वेळ वाट पाहिली तरी रेल्वे येत नसल्याने त्याने स्वतःच्या फोनवरून 112 नंबर डायल करून मी आत्महत्या करीत असून माझी डेड बॉडी घ्यायला या, असे सांगितले. पोलिसांनी सदरचे घटनास्थळ शहर ठाण्याच्या हद्दीत असल्याने तातडीने पुढील सूत्रे हलविली. तत्काळ घटनास्थळी पोहोचून सदर तरूणाचा जीव वाचविला. पोलिस ठाण्यात आणून त्याचे समुपदेशन देखील केले, तेव्हा कुठे त्याच्या डोक्यातून न सापडलेल्या प्रेयसीचे भूत निघाले. निरीक्षक अनिल भवारी, सपोनि कल्याणी वर्मा, पोलिस नाईक चंद्रकांत सोनवणे, हवालदार दीपक पाटील, डायल 112 चे सहा. फौजदार सुनील पवार, चेतन ढाकणे यांनी या कामगिरीत भाग घेतला.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button