जळगाव नजिकच्या मोहाडीत पत्त्यांच्या डावातील वादावरून आखाजीला तुफान दगडफेक

माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांच्या कारचे मोठे नुकसान

जळगाव टुडे । तालुक्यातील मोहाडी येथे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पत्त्यांच्या डावात झालेल्या वादातून शुक्रवारी (ता.10) रात्री उशिरा तुफान दगडफेक झाली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे यांच्या घरावर देखील दगड फेकण्यात आले. त्यामुळे घरासमोर उभ्या असलेल्या सोनवणे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत. दरम्यान, दोन्ही गटाकडून कोणतीच तक्रार न आल्याने पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली नाही. (Crime News)

मोहाडीत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दुपारी पत्त्याच्या डावात काहीजणांमध्ये वाद झाला होता. तो मिटविण्यासाठी रात्री दोन्ही गट एकत्र आले होते. त्याचवेळी पुन्हा वाद झाल्याने दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करण्यात सुरूवात केली. काहींनी पवन सोनवणे यांच्याही घरावर दगड फेकले. त्यामुळे त्यांच्या घराच्या खिडक्यांचे काच फुटले. रस्त्यावर उभ्या असलेल्या पवन सोनवणे यांच्या कारचे देखील मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा तसेच औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे कर्मचारी मोहाडी येथे पोहोचले. त्याठिकाणी निर्माण झालेला तणाव निवळेपर्यंत पोलिस तिथेच थांबून होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. नाना तायडे, पोउनि गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, विजय पाटील व अन्य अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. तसेच क्यूआरटीचे दोन पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button