कासोद्यातील तीन तरूणांसोबत लग्न करून रफूचक्कर झालेल्या परप्रांतीय महिलांना अटक
धरणगाव तालुक्यातील नांदेडच्या दोन मधस्थी महिलांचाही समावेश
Jalgaon Today : जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील तीन तरूणांशी लग्न लावून नंतर पैसे व सोने घेऊन फरार झालेल्या तीन परप्रांतीय महिलांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. अटक झालेल्या महिलांमध्ये धरणगाव तालुक्यातील नांदेडच्या दोन अन्य मधस्थी महिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात एकूण पाच महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)
सदर गुन्ह्यातील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्ह्यातील महिला आरोपी मोना दादाराव शेंडे (वय-25) आणि सरस्वती सोनू मगराज (वय-28) दोन्ही रा. रायपुर (छत्तीसगड) तसेच अश्विनी अरुण थोरात (वय-26) रा. पांढुरना (मध्यप्रदेश) या तिघींचे कासोदा गावांतील तीन तरूणांसोबत सरलाबाई अनिल पाटील (वय 60) आणि उषाबाई गोपाल विसपुते (वय-50) दोन्ही रा. नादेड ता.धरणगाव यांनी 16 एप्रिल 2024 रोजी लग्न लावून दिलेले होते. यातील एका आरोपी महिलेने कबुल केले आहे की, आमच्या तिघींचे या पूर्वी लग्न झालेले असून आम्हाला मुले देखील आहेत. आम्ही तिघी फसवणुकीचा प्रकार करण्यासाठी महाराष्ट्रात आलेलो आहोत.
फिर्यादी व त्यांचे दोन साथीदार अशांना एजंट महिला आरोपी सरलाबाई अनिल पाटील आणि उषाबाई गोपाल विसपुते (दोघे रा.नांदेड) यांनी उपवर तिन्ही मुलांच्या घरच्यांना विश्वासात घेवुन व त्यांच्याशी लग्न लावुन देण्याचे आमिष दाखवुन वेळोवेळी संपर्क करून, खोटे सांगून लग्नासाठी उपवर तिन्ही मुलांच्या घरांच्याकडून सुमारे 4 लाख 13 हजार रुपये उकळले होते. दरम्यान, ज्यांची लग्ने कासोद्यातील तरूणांशी लावून दिली होती, त्या तिन्ही महिलांची आधीच लग्ने झालेली होती. यापूर्वी लग्न झालेले असून सुध्दा त्यांनी ती माहिती लपवून फिर्यादीची व त्यांच्या दोन साथीदारांची आर्थिक फसवणुक केली.
सदर आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर पवार, सहा.पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगांव भाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंह राजपुत, सफौ रवींद्र पाटील, पोहेकॉ राकेश खोंडे, पोना किरण गाडीलोहार, पोकॉ इम्रान पठाण,पोकाँ नितिन पाटील, मपोकाँ सविता पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.