जादूटोण्याचा संशय…महिलेसह पुरूषाला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले : Crime News

Jalgaon Today : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह तिच्यासोबतच्या एका पुरूषाला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची अमानुष आणि खळबळजनक घटना पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात घडली आहे. याप्रकरणी तब्बल 15 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे. जननी देवाजी तेलामी (वय ५२) आणि देवू कटयी आतलामी (वय ५७, दोघे रा. बारसेवाडा, जि. गडचिरोली) अशी मयतांची नावे आहेत. धक्कादायक प्रकार म्हणजे आरोपींमध्ये मृत महिलेच्या पतीचा देखील समावेश आहे. (Crime News)

प्राप्त माहितीनुसार, बारसेवाडा येथील एका महिलेचा दोन वर्षांपूर्वी अचानक गर्भपात झाला होता. त्यानंतर काही दिवसातच त्या कुटुंबातील दोन मुलींचा लागोपाठ मृत्यू झाला होता. दरम्यान, एकाच घरात अचानक मृत्यूसत्र सुरू झाल्याचे लक्षात आल्यानंतर गावात उलटसुलट चर्चांना चांगलाच ऊत आला. सदरचा प्रकार जादूटोण्याचा असून, तो जननी तेलामी आणि देवू आतलामी हेच करीत असल्याचा संशय अनेकांनी बोलून दाखवला होता. त्याच कारणावरून जननी आणि देवू या दोघांना 01 मे रोजी रात्री घरी जाऊन मारहाण देखील करण्यात आली होती आणि गावापासून काही अंतरावरील एका नाल्यात दोघांना जिवंत जाळण्यात आले होते.

अंगावर टाकण्यात आले होते पेट्रोल
जादूटोण्याच्या संशयावरून जननी तेलामी आणि देवू आतलामी यांना मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकले होते. तसे पाहिले तर त्या दोघांना यमसदनी पाठविण्याचा निर्णय हा जातपंचायतीत 01 मे रोजीच घेण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांना तपास करताना मिळाली आहे. दोघांना मारण्यात गावातील अनेक मोठ्या लोकांचा सहभाग असून, जननी तेलामीचा भाऊ शाहू मोहनंदा याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आतापर्यंत 15 संशयित आरोपींना जेरबंद केले आहे. सदरच्या घटनेने संपूर्ण गडचिरोली जिल्हा हादरला असून, आरोपींना कठोर शिक्षा ठोठावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button