बोरनारला दहावीच्या वर्गातील विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या
एमआयडीसी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
Jalgaon Today : जळगाव तालुक्यातील बोरनार येथील विद्यार्थिनीने राहत्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मानसी नरेंद्र देशमुख (वय 16, रा. बोरनार) असे तिचे नाव आहे. (Crime News)
बोरनार येथे मानसी ही आई-वडील, भाऊ यांच्यासह राहत होती. तिचे आई- वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह भागवितात, तर काका रत्नाकर देशमुख हे सैन्यदलात कार्यरत आहेत. मानसी हिने नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली होती. रविवारी सकाळी उठल्यावर तिने सर्व घरकाम केले. त्यानंतर घरात सदस्य असताना मानसीने दुसऱ्या खोलीत जाऊन छताला गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एकच आक्रोश केला. नातेवाइकांसह शेजाऱ्यांच्या मदतीने मानसी हिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून तिला मयत घोषित केले. यावेळी देशमुख कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. मानसी देशमुख हिने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. एमआयडीसी पोलिस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.