लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू सोन्याचे दागिने घेऊन पसार, जळगावमध्ये फसणुकीचा गुन्हा दाखल

Crime News : सुमारे एक लाख रूपये देऊन लग्न करून आणलेली नववधू दुसऱ्याच दिवशी अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह पसार झाल्याचा खळबळजनक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगलीची मध्यस्थी महिला पूजा विजय माने तसेच नववधू नंदिनी राजू गायकवाड (रा.अकोला) आणि तिची मैत्रीण नीता अर्जून गणवार यांच्या विरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

लग्नकार्य आटोपल्यानंतर सुखी संसाराचे स्वप्न पाहणारा नवरदेव आणि त्याचे नातेवाईक दिवसभराच्या थकव्याने रात्री गाढ झोपले होते. मात्र, नववधू आणि तिच्या सोबतची मैत्रीण यांना रात्रभर झोप लागली नव्हती. कधी संधी मिळते याची वाट पाहून दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न घरातले सर्वजण साखर झोपेत असल्याची संधी साधून दोघींनी कोणाला थांगपत्ता न लागू देता पलायन केले. सकाळी उठल्यावर नववधू आणि तिची मैत्रीण जागेवर दिसून न आल्याने सर्वांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला. पण काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान, शेजारच्या महिलेने काळ्या रंगाच्या एका चारचाकी गाडीत दोघीजणींना जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचा प्रकार संबंधितांच्या लक्षात आला.

तरसोदच्या गणपती मंदिरावर पार पडला होता विवाह सोहळा

जळगाव शहर महानगरपालिकेत पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले शरद काशिनाथ चौधरी हे त्यांचा मुलगा मयूर याच्या लग्नासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्नशील होते. तशात एके दिवशी त्यांना सांगलीची रहिवाशी महिला पूजा विजय माने हिचा फोन आला. तिने मेहकर,जि.बुलडाणा येथे मुलगी असल्याची बतावणी करून तुम्ही स्वतः येऊन बघून घ्या, असे सांगितले. दरम्यान, मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पूजा माने हिने चौधरी कुटुंबाकडे सुमारे दोन लाख रूपयांची मागणी केली. मात्र, तेवढी रक्कम आमच्याकडे नसल्याचे सांगून चौधरींनी तिला फक्त एक लाख देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार सर्व काही ठरल्याने मयूर आणि नंदिनी यांचा विवाह सोहळा तरसोदच्या गणपती मंदिरावर पार पडला होता.

छत्रपती संभाजीनगरात लावले दुसरे लग्न, तिथुनही झाली पसार

दरम्यान, जळगाव शहरातील चौधरी कुटुंबाच्या हातावर तुरी देऊन पोबारा करणाऱ्या नववधुने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरच्या एका तरूणाशी दुसरे लग्न केले. पूजा मानेच्या मध्यस्थीनेच ते लग्न लागले होते. धक्कादायक प्रकार म्हणजे वैजापुरच्या तरूणाशी लग्न लागल्यानंतर नंदिनी गायकवाड तिथुनही पसार झाली होती. वृत्तपत्रातील बातमीतून नववधू आणि तिच्या मैत्रिणीचे कारनामे लक्षात आल्याने जळगावच्या चौधरी यांनी जळगावच्या शनिपेठ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार दोघींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button