कापूस व्यापाऱ्याचे दीड कोटी रूपये लुटणाऱ्या टोळीचा मास्टर माईंड निघाला विदगावचा अनिल उर्फ बंडा कोळी
Crime News : जळगाव-धरणगाव दरम्यानच्या मुसळी फाट्यावर शनिवारी (ता. 17) कापूस व्यापाऱ्याचे सुमारे दीड कोटी रूपये अज्ञात व्यक्तींनी लुटले होते. याप्रकरणाचा मास्टर माईंड विदगाव (ता.जळगाव) येथील अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी हा निघाला असून, त्याला त्याच्या एका साथीदारासह अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपींकडून सुमारे 48 लाख रूपये रोख तसेच चार वाहने व हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इंपेक्स जिनिंगची रक्कम घेऊन व्यापाऱ्याची माणसे जळगावहून पिंप्रीकडे येत होते. दरम्यान, मुसळी फाट्याजवळ उड्डाणपुलाच्या खाली व्यापाऱ्याची गाडी येताच बोलेरो कारमधून समोरून आलेल्या काही अज्ञात लुटारूंनी मिरचीची फूड फेकून आतमध्ये बसलेल्या कॅशियरच्या मांडीवर चाकुने वार करीत सुमारे दीड कोटी रूपयांची रक्कम हिसकावून जळगावच्या दिशेने पोबारा केला होता. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी गोपनीय बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींच्या शोधासाठी चार पथके रवाना केली होती. दरम्यान, तपास पथकाने जळगाव तालुक्यातील विदगाव येथून अनिल उर्फ बंडा कोळी यास ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता, मुसळी फाट्यावरील दीड कोटी रूपयांच्या लुटीत त्याचा व त्याच्या इतर साथीदाराचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्ह्यात लुटण्यात आलेल्या रकमेपैकी सुमारे 48 लाख रूपये रोख तसेच चारचाकी चार वाहने व हत्यारे आरोपी अनिल उर्फ बंडा याचेकडून जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अनिल कोळी आणि दर्शन भगवान सोनवणे (दोन्ही रा. विदगाव) यांना ताब्यात घेतले असून, दोघांच्या विरोधात धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची कलमे वाढविण्यात आली आहेत. दोन्ही आरोपींच्या विरोधात यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल आहेत.