बहिणीसह तिच्या प्रियकराला संपवणाऱ्या चोपड्याच्या भावांना जन्मठेपेची शिक्षा
- पुरावे नष्ट करण्याचा सल्ला देणाऱ्या वकीलास कारावास
Crime News | जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात बहिणीचे दुसऱ्या जातीच्या तरुणावर प्रेम असल्याच्या रागातून भावांनी दोघांची हत्या केली होती. याप्रकरणी न्यायालयाने बहिणीसह तिच्या प्रियकराला संपवणाऱ्या सर्व भावांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पुरावे नष्ट करण्याचा सल्ला देणाऱ्या वकीलास सुद्धा पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
चोपडा शहर पोलिस ठाण्यात दाखल दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील प्रकरणात मयत वर्षा समाधान कोळी आणि राकेश संजय राजपूत यांच्यात दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर संशयित आरोपी हे त्यांच्या बहिणीला राकेश हा दुसऱ्या समाजाचा असल्यामुळे त्याच्याशी असलेले प्रेम संबंध ताबडतोब तोडून टाकण्यासाठी दबाव आणत होते. त्यावरून त्यांच्या घरात नेहमी वाद देखील होत होते. दरम्यान, 12 ऑगस्ट 2022 रोजी राकेश राजपूत हा संशयित आरोपींच्या घरी रात्री आला आणि त्याने वर्षा कोळी हिच्याशी प्रेमसंबंधाची कबुली दिली. त्याचा राग संशयित आरोपींना आल्याने त्यांच्यात मोठा वाद झाला. यावेळी संशयितांनी वर्षा कोळी व राकेश राजपूत दोघांनाही दुचाकीवर बसवून चोपडा शहराजवळील नाल्याजवळ नेले. तेथे राकेश राजपूत याला बंदुकीने गोळी झाडून यमसदनी पाठवले. तर वर्षा कोळी ही प्रतिकार करीत असताना तिची देखील गळा दाबून हत्या केली. याशिवाय पुराने नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा न्यायाधीश पी.आर.चौधरी यांच्यासमोर खटल्याचे कामकाज चालले. सरकारी वकील ॲड. किशोर बागुल यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात तुषार आनंदा कोळी (वय 23), भरत संजय रायसिंग (वय 22), बंटी उर्फ जय शांताराम कोळी (वय 19), आनंदा आत्माराम कोळी (वय 56) रवींद्र आनंदा कोळी (वय 20) यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, प्रत्येकी तीन हजार रुपये दंड देखील ठोठावला. तसेच संशयित आरोपी पवन नवल माळी आणि वकील नितीन मंगल पाटील यांनाही पाच वर्षे शिक्षा आणि एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा सुनावली आहे.