ममुराबाद रस्त्यावरील दुचाकी अपघात प्रकरणी एसटीच्या बस चालकावर गुन्हा दाखल
Crime News : जळगाव-ममुराबाद रस्त्यावर चोपडा आगाराच्या भरधाव बसने कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिल्याने दोन तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.27) घडली होती. दोन्ही जखमींवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात सध्या उपचार सुरू असून, याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात बस चालक सतीश मुरलीधर बाविस्कर (रा.चोपडा) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
आलम शेख (वय 28, रा. आझादनगर पिंप्राळा) तसेच सादीक जुम्मा पिंजारी (वय 20, रा. आझादनगर पिंप्राळा) हे दोघे स्टील रेलिंगची कामे करण्यासाठी ममुराबाद येथे गेले होते. रमजान महिन्याचे रोजे सुरू असल्याने दिवसभराचे काम लवकर आटोपून बुधवारी सायंकाळी दोघेही जळगावकडे एचएफ डीलक्स मोटारसायकलीवरून (क्रमांक- जीजे 06/केई 0542) डबल सीट निघाले होते. ममुराबादपासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर कृषी संशोधन केंद्रासमोर जळगावकडून चोपड्याकडे जाणारी भरधाव एसटी बस (क्रमांक- एमएच 14/बीटी 2214) अचानक त्यांच्या अंगावर आली. काही कळायच्या आत दोन्हीजण बसने जोरदार धडक दिल्याने खाली पडले. अपघातात दोन्हीही सुदैवाने बचावले पण जबर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बससमोर कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरचा अपघात झाला. दरम्यान, दुचाकीला धडक देऊन विरूद्ध दिशेला असलेल्या लिंबाच्या मोठ्या झाडावर जाऊन धडकल्याने एसटीच्या बसचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.