यावल शहरात पोलिसांनी थांबविले आत्महत्या केलेल्या दिव्यांगाचे अंत्यसंस्कार
Crime News : यावल शहरातील रेणुकादेवी मंदिर परिसरातील 45 वर्षीय दिव्यांगाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.25) रात्री उशिरा घडली. दरम्यान, गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या सदर दिव्यांगाच्या मृत्युबाबत पोलिसांना कोणतीच माहिती न देता त्याच्या मृतदेहाचा परस्पर अंत्यविधी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच स्मशानभूमीत जाऊन त्याचा अंत्यविधी थांबविला व यावल ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन पूर्ण केले.
बाळू लक्ष्मण वाणी (वय 45) या दिव्यांगाने सोमवारी (ता.25) रात्री 11 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी नीलेश नारायण वाणी यांनी यावल पोलिस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे करीत आहे. यावलच्या ग्रामीण रूग्णालयात मयत बाळु वाणी याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. दिव्यांग बाळू वाणी हा त्याच्या 85 वर्षीय आईसोबत रेणुकादेवी मंदिर परिसरात राहत होता. त्याने अचानक केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हळहळ देखील व्यक्त होत आहे.