भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार दिल्लीतून चोरीला
Crime News : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांची फॉर्च्युनर कार दिल्लीतून चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू असताना, तपासाला दिशा देणारे महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. त्याआधारे सदरची कार गुरगावच्या दिशेने जाताना दिसली आहे.
एका प्रसिद्धी माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांच्या नावावरील फॉर्च्युनर कारची हिमाचल प्रदेशात नोंदणी करण्यात आली आहे. फॉर्च्युनर कंपनीची ती कार श्री.नड्डा यांचा चालक जोगिंदर सिंग गॅरेजमध्ये नियमित सर्व्हिसिंगसाठी घेऊन गेला होता. तिथून परत आल्यानंतर दिल्लीच्या गोविंदपुरी भागातील आपल्या घरी जेवणासाठी तो गेला तेव्हा कार त्याच्याकडेच होती. तिथूनच ती कार चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. दुपारी तीनच्या सुमारास चालक जोगिंदर सिंग याने नड्डा यांची कार सर्व्हिसिंगसाठी गॅरेजला नेली होती. जेवण करून परत आल्यावर जागेवर कार दिसली नसल्याची माहिती जोगिंदर सिंगने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी महामार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यातील एका कॅमेऱ्यात नड्डा यांची कार चोरटे घेऊन जाताना दिसल्याचे सांगण्यात येत आहे. सदर कार गुरगावच्या दिशेने जाताना दिसली असून त्यानुसार दिल्ली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.