धानवडच्या अल्पभूधारक शेतकऱ्याची बैलजोडी एकदा नाही दुसऱ्यांदा चोरीला गेली !
Crime News : घरची जेमतेम तीन एकर शेती असताना मदतीला बाळगलेली बैलजोडी चोरीला गेल्याने धानवड (ता.जि.जळगाव) येथील शेतकरी कैलास लक्ष्मण पाटील यांचेवर मोठे संकट ओढवले आहे. दोन वर्षापूर्वी देखील त्यांची अशीच एक बैलजोडी चोरीला गेली होती आणि तिचा नंतर कोणताच तपास लागला नव्हता.
तीन एकर शेतीत कुटुबांचा उदरनिर्वाह भागविणारे कैलास पाटील यांनी शेती मशागतीची कामे सुलभ होण्याकरीता सुमारे 80 हजार रूपयांची बैलजोडी बाळगली होती. चार-पाच दिवसांपूर्वी 17 मार्च रोजी दिवसभर शेतीची कामे आटोपून घरी आल्यानंतर त्यांनी सदर बैलजोडी आपल्या वाड्यात सोयानुसार बांधली होती. सायंकाळी उशिरा चारापाणी केल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन करून ते घरी झोपण्यासाठी निघून गेले. अज्ञात चोरट्यांनी रात्री साधारण अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन दोन्ही बैल चोरून नेले. सकाळी झाडझुड करण्यासाठी वाड्यात आल्यानंतर शेतकरी कैलास पाटील यांना त्यांची बैलजोडी जागेवर दिसली नाही. जवळपास कुठे असेल म्हणत त्यांनी सगळीकडे तपास देखील केला, पण कुठेच थांगपत्ता लागला नाही. बैलजोडी चोरीला गेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी जळगाव येथील औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे.
कुटुंबाचा मोठा आधार हरपल्यानंतर आता पुढे करावे तरी काय ?
सध्या सगळीकडे शेतीकामांची धांदल सुरू आहे. त्यात हाताशी असलेली बैलजोडी चोरीला गेल्याने कैलास पाटील यांचे कुटुंब खूपच हवालदिल झाले आहे. आधीच शेतीतून फार काही पिकत नसल्याने पोट भरण्याचे वांदे झाले होते, त्यात दुसऱ्यांदा बैलजोडी चोरीला गेल्याने त्यांच्यावर आता हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे. कुटुंबाचा मोठा आधार हरपल्यानंतर आता पुढे करावे तरी काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.