पारोळ्याच्या चौधरी गल्लीतील हद्दपार विजय उर्फ पलटी यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले
Crime News : विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी (रा.चौधरी गल्ली, पारोळा) यास एरंडोल येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये एक वर्षाकरीता जळगाव जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले होते. मात्र, तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पारोळा शहरात लपून छपून फिरत होता. अखेर त्यास जळगावच्या एलसीबीने अटक केली आहे.
हद्दपार आरोपी नामे विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी हा पारोळा शहरात लपुन छपुन फिरत असले बाबत जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांना गुप्त बातमी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार नंदलाल पाटील, प्रमोद लांडवंजारी, किरण धनगर, पोलिस नाईक भगवान पाटील, राहुल बैसाणे, मोतिलाल चौधरी यांच्या पथकास रवाना करुन पुढील कारवाई करणे बाबत आदेशित केले.
नमूद पथकाने बुधवारी (ता.13) आरोपीची गोपनीय माहितीच्या आधारे कुंडली काढली. पारोळा शहरात धरणगाव चौफुली येथे येताच दबा धरुन बसलेल्या सदरच्या पथकाने मोठ्या शिताफीने संशयित आरोपी विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी यास ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाई करुन पारोळा पोलिस ठाण्यात हजर केले. गुन्हा दाखल करुन त्यास आता पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, अमळनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवालकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.