पुण्यातून फरार झालेल्या हद्दपार आरोपीला चाळीसगाव पोलिसांनी 4 गावठी कट्ट्यांसह केली अटक

Crime News : पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्यात खुनासह मोक्का अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या हद्दपार आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांनी 04 गावठी कटट्यांसह अटक केली आहे. सदर आरोपीने एवढ्या मोठया प्रमाणात शस्त्रसाठा कुठुन आणला? त्याने काही घातपाती कारवाया करण्याचा कट रचला आहे काय ? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु झाला आहे.

चाळीसगांव शहर पोलिस ठाण्याच्या हददीत रविवारी (ता. 10) आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे रोड, तेजस कोनार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली होती. दरम्यान धुळ्याकडुन मोटार सायकलीने (MH12/ VX 3008) चाळीसगावचे दिशेने दोन तरूण येत होते. पोलिसांची नाकाबंदी सुरु असलेली पाहून गाडी चालविणाऱ्या इसमाने काही अतंरावर मोटार सायकल थांबविली. तेव्हा पाठीमागे बसलेला इसम गाडीवरुन उतरुन धुळे रस्त्यालगतच्या रहिवाशी परिसरात पळून गेला. त्यामुळे पोलिस स्टाफने पळत जावून मोटार सायकल चालवित असलेल्या इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे व पळून गेलेल्या इसमाचे नांव पत्ता विचारला असता, त्याने स्वतःचे नाव आमीर आसीर खान (वय 20, रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे) आणि त्याच्या सोबत असलेल्या इसमाचे नाव आदित्य भोईनल्लु, रा. पुणे असे सांगितले.

ताब्यात घेतलेला आमीर आसीर खान याचेकडील सॅक (बॅग) तपासली असता त्यामध्ये गावठी बनावटीचे 04 पिस्टल, 05 मॅगझीन तसेच 10 जिवंत काडतूस, एक मोटार सायकल, असा एकुण 02 लाख रूपये किंमतीचा शस्त्रसाठा व मुद्देमाल मिळून आला. त्यामुळे दोन्ही आरोपींचे विरुध्द चाळीसगांव शहर पोलिस ठाण्यात पोकॉ पवन पाटील यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात मिळून आलेला आरोपी आमीर आसीर खान याचेकडे केलेल्या तपासात तो शरीराविरुध्द गंभीर गुन्हे करणारा सराईत, तडीपार असलेला गुन्हेगार असून समर्थ पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात भादवि कलम 302, 304 सह संघटीत गुन्हेगारी अधिनियम प्रमाणे दाखल गुन्हयात मागील सहा महिन्यापासुन तो फरार आहे. त्याचेवर एकुण सहा गंभीर गुन्हे दाखल असुन त्याला पुणे जिल्ह्यातुन दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. नमुद आरोपीचा साथीदार आदित्य भोईनल्लु, रा. पुणे हा फरार असुन त्याचा देखील शोध सुरु आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार प्रकाश पाटील, उज्वलकुमार म्हस्के हे करीत आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button