चुंचाळ्याचा ग्रामसेवक व ऑपरेटरला एक लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
Crime News : केंद्र सरकारकडून शिलाई मशिन प्रशिक्षण प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या निधीतील एक लाख रूपयांची रक्कम लाचेच्या स्वरूपात स्वीकारताना चुंचाळे (ता.यावल) येथील ग्रामसेवक व डीटीपी ऑपरेटरला शनिवारी (ता. 17) पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
प्राप्त माहितीनुसार, चुंचाळे येथील तक्रारदार व्यक्तीची त्यांच्या वडिलांच्या नावाने एक संस्था कार्यरत आहे. त्यामाध्यमातून 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीतून चुंचाळे गावात महिलांसाठी शिलाई मशिन प्रशिक्षणाचे काम केले जात होते. त्याकरीता केंद्र सरकारकडून सुमारे 2 लाख रूपयांचा निधी देखील मंजूर झाला होता. दरम्यान, मंजूर निधीतून सुमारे एक लाख रूपये रक्कम चुंचाळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हेमंत जोशी (रा.साकळी) यांनी मागितली होती. त्यासंदर्भात तक्रार जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे आल्यानंतर पोलिसांकडून सापळा रचण्यात आला. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास ग्रामसेवक हेमंत जोशी यांच्या सांगण्यावरून डीटीपी ऑपरेटर सुधाकर कोळी यास एक लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलिस उपअधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल वालझाडे, एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलिस नाईक बाळू मराठे, सुनील वानखेडे, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप घोळ, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी यांनी यशस्वी कामगिरी केली.