पाचोऱ्यातील व्यापाऱ्याला 33 लाखांचा ऑनलाईन गंडा, सायबर पोलिसात गुन्हा दाखल
Crime News : शेअर खरेदी करून त्यातून अधिकचा नफा देण्याचे अमिष दाखवत पाचोरा येथील व्यापाऱ्याला सुमारे 33 लाख 30 हजार रुपयांत गंडविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरची घटना 19 जानेवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यानच्या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी जेसिका नाव सांगणाऱ्या अज्ञात आरोपीच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा येथील व्यापारी रमेश शंकरलाल मोर (वय ६५) यांना जेसिका नामक व्यक्तीने 19 जानेवारी ते 29 फेब्रुवारीदरम्यान वेळोवेळी संपर्क साधून एका कंपनीच्या शेअरची खरेदी केल्यास त्यातून अधिक नफा मिळेल, असे अमिष दाखवले. त्यासाठी एका ॲपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगून शेअर खरेदी करायला सांगितले. शेअर खरेदी केल्यानंतर ॲपवरील खात्यावर वाढीव रक्कम दाखवून मोर यांचा विश्वास संपादन केला. त्या माध्यमातून वेळोवेळी 36 लाख 100 रुपये ऑनलाईन स्वीकारले. त्यापैकी 2 लाख 70 हजार रुपये परत देखील केले. मात्र उर्वरित 33 लाख 30 हजार 100 रुपये न देता फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश मोर यांनी मंगळवारी (ता.05) रोजी दुपारी २ वाजता जळगाव येथील सायबर पोलिस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.