भुसावळ शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली चालविला जात होता कुंटणखाना
पोलिसांकडून दांपत्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई
Crime News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात महेशनगर भागात ‘माइंड अँड बॉडी स्कीन केअर स्पा’च्या नावाखाली कुंटणखाना चालविणाऱ्या दांपत्याच्या विरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. सदरचे ठिकाण हे रहिवासी वस्तीतील असून, तिथे महिलांना आर्थिक आमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त केले जात होते.
भुसावळमधील महेशनगर भागात ‘माइंड अँड बॉडी स्कीन केअर स्पा’ नावाखाली विशाल शांताराम बऱ्हाटे व त्याची पत्नी पल्लवी विशाल बऱ्हाटे हे स्वतःच्या घरात आर्थिक फायद्याकरीता महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेण्यासाठी कुंटणखाना चालवित असल्याची गोपनिय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रूपाली चव्हाण, सुदर्शन वाघमारे, महिला सहाय्यक फौजदार शालिनी वलके, सहाय्यक फौजदार प्रदिप पाटील, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अश्विनी जोगी, हवालदार अनिल झुंझारराव यांच्या सहाय्याने सदरच्या ठिकाणी दोन पंच व पंटरसह पंचनाम्याच्या साहित्यासह जाऊन छापा टाकला.
पोलिसांना छापा टाकल्यावर देह व्यापार चालविणारे विशाल शांताराम बऱ्हाटे (वय 38) व त्याची पत्नी पल्लवी विशाल बऱ्हाटे (वय 39) तसेच देह व्यापार करणाऱ्या करमाडा (जि. सोलापूर) हल्ली मुक्काम मगरपट्टा पुणे ,जामखेड (जि. अहमदनगर), पहुर (जि. जळगाव), पिंपरी चिंचवड (पुणे), कुलाबा (मुंबई) येथील रहिवासी पाच पिडीत महिला आणि दोन इसम आढळून आले. याशिवाय छाप्यात देह व्यापारास वापरले जाणारे साहित्य मिळून आले. सदरचे ठिकाण हे रहिवासी वस्तीमधील असून, बऱ्हाटे पती व पत्नी हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी महिलांना देह व्यापारास प्रवृ्त्त करीत होते. अशा प्रकारच्या अनैतिक व्यापार व असामाजिक कृत्य करणाऱ्या इसमांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.