Crime News : जळगावात रक्षा बंधनासाठी बहिणीकडे गेलेल्या भावाच्या घरातून चोरट्यांनी १२.५ लाखांचा ऐवज केला लंपास !
Crime News : रक्षा बंधनाच्या सणासाठी बहिणीकडे गुजरातमध्ये गेलेल्या जळगावमधील भावाच्या घरातून चोरट्यांनी सुमारे १२.५ लाखांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करून एका चोरट्याला जेरबंद केले असून, अन्य तीन चोरटे मुद्देमाल घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
Crime News: Thieves looted 12.5 lakhs from the brother’s house who went to his sister for Raksha Bandhan in Jalgaon!
जळगाव शहरातील महावीर नगरातील रहिवाशी नितीन खंडारे हे वडोदरा येथे बहिणीकडे रक्षा बंधनासाठी गेलेले असताना, चार चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडला. अडीच ते तीन लाखांच्या रोख रकमेसह सुमारे साडेआठ लाखांचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर चोरट्यांनी नितीन खंडारे यांच्याच दोन दुचाकीवरून पळ काढला. दरम्यान, जळगाव शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर उन्हाळे यांना दोन दुचाकीवरून चार जण भरधाव वेगाने जाताना दिसले. त्यानंतर उन्हाळे यांचेसह त्यांच्यासोबतचे नितीन केदारे, तुषार मिस्तरी यांनी चोरट्यांचा पाठलाग केला.
एक चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, तीन जण पळून जाण्यात यशस्वी
शहर पोलिसांनी बजरंग बोगद्याच्या दिशेने पळून जात असलेल्या चोरट्यांचा पाठलाग केला. दरम्यान, काही चोरटे बजरंग बोगद्याजवळील रेल्वेची संरक्षण भिंत चढून मुद्देमालासह पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र, एक जण भिंतीवर चढता न आल्याने पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी मोटार सायकलीसह त्याला शहर पोलिस ठाण्यात आणले. तेव्हा तो मध्य प्रदेशातील असल्याचा उलगडा झाला. तो आणि त्याच्या साथीदारांनी यापूर्वी जिल्हा पेठ भागातही चोरी केल्याचे कबूल केले. शहर पोलिसांनी अन्य तीन फरार चोरट्यांच्या शोधासाठी पथके तयार केली असून, वेगवेगळ्या दिशेला पाठवली आहेत.