भडगाव तालुक्यात गिरणेच्या पात्रातून वाळुचा अवैध उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
Crime News : जळगाव जिल्ह्यातील वाक (ता. भडगाव) येथील गिरणा नदीच्या पात्रातून वाळुचा अवैध उपसा करणाऱ्या वाहनांवर चाळीसगावच्या उपविभागीय पोलिस पथकाने शनिवारी धडक कारवाई केली. या कारवाईत पाच डंपर, पाच स्वराज ट्रॅक्टर, दोन जेसीबी जप्त केले आहेत. भडगाव पोलिस ठाण्यात 10 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शासकीय ठेक्यांचा विषय अद्याप मार्गी लागलेला नसताना, भडगाव तालुक्यात गिरणेच्या पात्रातून सर्रासपणे वाळुचा अवैध उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वाळुचा उपसा करणाऱ्यांवर झडप घातली. याप्रकरणी संदिप मुरलीधर पाटील (रा. वडगाव सतीचे), अक्षय देविदास मालचे, प्रविण विजय मोरे, मच्छिंद्र गिरधर ठाकरे, ललित रामा जाधव, शुभम सुनील भिल, रणजित भास्कर पाटील, रवी पंचर, गणेश मराठे, भोला गंजे (सर्व रा. भडगाव) यांच्या विरोधात भडगाव पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर- पवार, सहाय्यक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुषार देवरे, पोलिस नाईक राजेंद्र निकम, हवालदार भगवान पाटील, विकास पाटील, विश्वास देवरे, महेश बागूल, चेतन राजपूत, सुनील मोरे, श्रीराम कांगणे, समाधान पाटील, राहुल महाजन, सुदर्शन घुले यांनी सदरची कारवाई केली.