Crime News : अमरावती शहरातही एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार !
Crime News : उरणमधील यशश्री शिंदेची एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच आज बुधवारी सकाळी अमरावती शहरातील राजपेठ अंडरपास येथे एक अल्पवयीन मुलगी कॉलेजला जात असताना, तिच्या परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने तिचा पाठलाग करत तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी मुलीच्या गळ्याला सहा टाके घातले आहेत आणि तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
Crime News: A minor girl was stabbed with a knife due to one-sided love in Amravati city too!
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी तरुण या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याच्या या प्रेमाचा मुलीने विरोध केल्याने त्याने हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे. आरोपी गेल्या काही दिवसांपासून या मुलीचा सतत छळ करून तिला पाठलाग करायचा आणि तिचा रस्ता अडवायचा. तो मुलीला जीवे मारण्याची आणि ॲसिड हल्ला करण्याची धमकीही देत होता. मुलीने आरडाओरड केल्यामुळे त्याठिकाणी असलेले रिक्षावाले मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. प्रफुल्ल असे त्याचे नाव आहे.
यापूर्वीही तरुणीच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती
पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रफुल्लला रिक्षाचालकाने पकडून चोप दिला. त्यानंतर आरोपीला अमरावती शहरातील राजापेठ पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जखमी तरुणी सध्या अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. यापूर्वीही तरुणीच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती, त्यावेळीही पोलिसांनी त्याला अटक करून राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.