Crime News : एकतर्फी प्रेमातून तरूणीची निर्घृण हत्या; मारेकऱ्याकडून मृतदेहाची विटंबना !
Crime News : नवी मुंबईच्या शेजारच्या उरण शहरातील एनआय स्कूलजवळ राहणारी २२ वर्षीय यशश्री शिंदे नावाची तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. मात्र, तिचा मृतदेह कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असता, तिच्या शरीराची विटंबना झाल्याचे स्पष्ट झाले. चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा आढळून आल्या. या घटनेने उरण शहरात संतापाचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.
Crime News: One sided love brutally killed the young woman and mutilated the body!
यशश्री दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबियांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी तिचा शोध घेत असताना सकाळी कोटनाका पेट्रोल पंपाजवळ तिचा मृतदेह सापडला. मृतदेहावर विटंबनेच्या खुणा दिसताच पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. या प्रकरणात अत्यंत निर्दयीपणे तिचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकांची स्थापना केली आहे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. माध्यमांशी बोलत असताना यशश्री शिंदेच्या वडिलांनी दाऊद शेख नामक तरूणावर हत्या केल्याचा आरोप केला आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांनाही संशय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री तिच्या कुटुंबीयांसह उरण येथे राहत होती आणि ती बेलापूरमधील एका कंपनीत काम करत होती. गुरुवारी, २५ जुलै रोजी सकाळी कामावर निघाल्यापासून यशश्री बेपत्ता होती. तिचा फोन लागत नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि नंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पोलीस यशश्रीचा शोध घेत असताना, रेल्वे स्थानकाजवळील झुडुपात एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी जाऊन त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली असता, तो यशश्रीचा असल्याचे निष्पन्न झाले. उरण शहरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि कुठलीही अफवा पसरवू नये, असे आवाहन केले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे.