Crime News : सरपंचपदाच्या निवडणुकीचा वाद; वडनगरीत उमेदवाराच्या भावाला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न !
Crime News : जळगाव तालुक्यातील वडनगरीत सरपंचपदाच्या निवडणुकीत वाद झाल्यानंतर उमेदवाराच्या भावाला विरोधी गटाच्या लोकांनी विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात कलम ३०७, १४३, १४९, ३२३, ५०६, १२० (ब) तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News : Sarpanch election controversy; Attempt to kill candidate’s brother by poisoning him in Vadnagari !
तालुका पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, वडनगरी ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी गोरख गुलाब गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या कारणावरून शशिकांत प्रल्हाद सोनवणे, मृणाल भुवन पाटील, अनिल प्रल्हाद सोनवणे, कल्याण उत्तम पाटील, भुवन प्रभाकर पाटील यांनी गोरख गायकवाड यांचे भाऊ दीपक गायकवाड यांना जिवे मारण्याचा कट रचला. दीपक यास वडनगरी-खेडी रस्त्यालगतच्या खळ्यात बोलावले आणि जातीवाचक शिवीगाळ करून गाव सोडून जाण्यास सांगितले तरी जात नाही म्हणून मारहाण केली. तसेच हातपाय धरून त्याच्या तोंडात विषाची बाटली कोंबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, शशिकांत प्रल्हाद सोनवणे व मृणाल भुवन पाटील, अनिल प्रल्हाद सोनवणे, कल्याण उत्तम पाटील, भुवन प्रभाकर पाटील यांच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.