Crime News : मुक्ताईनगर तालुक्यात रस्त्यावर सापडलेला मृतदेह फेकून दिला होता लक्झरी बसच्या खिडकीतून !
Crime News : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात हरताळा फाट्यावर ५ जुलै रोजी अज्ञात व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अपघाताचा गुन्हा देखील दाखल केला होता. प्रत्यक्षात १३ दिवसांच्या तपासात सदर व्यक्तीचा मृत्यू हा अपघातात नव्हे तर धावत्या लक्झरी बसच्या खिडकीतून फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Crime News: The dead body found on the road in Muktainagar taluka was thrown from the window of a luxury bus!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ विकास बनसोड (वय ३५, रा.गोंडवाडी, ता.तिरोडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हरताळा फाट्यावर सिद्धार्थचा मृतदेह आढळल्यानंतर एखाद्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी नोंद पोलिसांनी घेतली. दरम्यान, नागपूरकडे जाणाऱ्या एका लक्झरी बसमधून एक व्यक्ती खाली पडल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. त्यादृष्टीने कसून तपास करत असताना, पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक राहूल बोरकर यांनी दसरखेडा टोलनाक्यावरून त्या दिवशी रात्री गेलेल्या लक्झरी बसेसची माहिती मिळवली. त्यातील नागपूरकडे गेलेल्या तीन बसेसमधील प्रवाशांचीही चौकशी केली. त्याच माध्यमातून गोंदिया जिल्ह्यापर्यंत मुक्ताईनगरचे पोलिस जाऊन पोहोचले.
चौकशीत लक्झरी बसमधील स्वप्निल गजराम परिहार (वय २७, रा.बोंदा, ता.तिरोडा, जि.गोंदिया) या प्रवाशाच्या भ्रमणध्वनीवरून नागपूरपर्यंतचे तिकीट बुक केल्याचे कळले. त्यानुसार पोलिसांनी तिरोडा तालुका गाठत गोंदा येथील स्वप्नीलचा शोध घेतला. त्याचा साथीदार भरत चुनीलाल रहांगंडाले (वय ३२, रा.भजेपार, ता.तिरोडा) यालाही पकडले. चौकशीत दोघांनी सिद्धार्थ विकास बनसोड (वय ३५, रा.गोंडवाडी, ता.तिरोडा) याला धावत्या लक्झरीच्या सीट क्रमांक ९ आणि १० च्या खिडकीतून फेकून दिल्याची कबुली दिली.