Crime News : मित्रानेच केला घात, जळगाव शहरातील तरुणाला चाकूने भोसकून फेकले नदीत !
Crime News : मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड परिसरात एका तरूणाचा चाकूने भोसकून खून केल्यानंतर मृतदेह पूर्णा नदीत फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. नितीन साहेबराव पाटील (वय २५, रा. कला वसंतनगर, असोदा रोड, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. नितीन पाटील याच्या एका मित्राने त्याच्याकडून १ लाख रुपये उसनवारीने घेतले होते. त्याच वादातून सदरचा खून झाल्याचे बोलले जात आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी याप्रकणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन पुढील तपासाला गती दिली आहे.
Crime News: The friend committed the attack: The youth of Jalgaon city was stabbed with a knife and thrown into the river!
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, उसनवारीने घेतलेले पैसे देण्यासाठी नितीन पाटील हा सारखा तगादा लावायचा. मात्र, नितीन पाटीलचा हा तगादा त्याच्या मित्राला आवडत नव्हता. त्यामुळे संशयित आरोपीने नितीन पाटील यास मुक्ताईनगर येथे बोलावून घेतले. “इकडे ये पैसे घेऊन जा आणि आपल्याला एका कार्यक्रमाला जायचे आहे, तिकडे आपण जाऊ” असे सांगून संशयित आरोपीने नितीनला तिकडे बोलावून घेतले. त्यानंतर डोलारखेडा शिवारात नेऊन तेथे काही मित्रांच्या मदतीने त्याचा चाकूने भोसकून खून केला. नंतर निर्दयीपणे मृतदेहाचे हात पाय बांधून तो पूर्णा नदीच्या पात्रात फेकून दिला.
इकडे नितीनच्या आईने खूप उशीर झाला तरी मुलगा घरी आला नाही म्हणून शोधाशोध केली. नितीनच्या भावाने त्याला फोन करून बोलावून घेणाऱ्या मित्रांना फोन लावला. मात्र, त्याच्या मित्राने उडवाउडवीची उत्तरे दिली. नितीनच्या भावाला संशय आल्याने त्याने थेट मुक्ताईनगर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी वैभव गोकूळ कोळी (वय २५) तसेच संतोष भागवत कठोरे (दोन्ही रा. कला वसंतनगर, जळगाव) या दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पूर्णा नदीच्या पात्रात पट्टीच्या पोहणाऱ्यांनी नितीनचा मृतदेह बाहेर काढला. मुलाचा मृतदेह पाहुन त्याच्या आई-वडिलांसह भावाने घटनास्थळीच आक्रोश केला. दरम्यान पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनीही घटनास्थळी देऊन पाहणी केली.