बहिणीचे मुस्लीम तरूणाशी लग्न…संतापलेल्या भावाने मेहुण्याचा काटा काढला !
जळगाव टुडे । बहिणीने मुस्लीम तरूणाशी आंतरधर्मीय विवाह केल्याने संतापलेल्या भावाने नातेवाईकांच्या मदतीने मेहुण्याचा गळा आवळून खून करून नंतर मृतदेह गूपचूप जाळून टाकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक देखील केली आहे. आमीर शेख असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. ( Crime News )
Crime News
पारनेर तालुक्यातील रांधे येथील मूळ रहिवासी असलेल्या आमीर शेख याचा खून झाल्याची घटना पुण्यातील मोशी औद्योगिक वसाहतीत गेल्या १५ दिवसांपूर्वी घडली होती. त्या खुनाच्या घटनेचा तपास पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी लावला आहे. आमीरचा खून करणारे पंकज विश्वनाथ पाईकराव, गणेश दिनेश गायकवाड, सुशांत गोपाळा गायकवाड, सुनील किसन चक्रनारायण यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पंकज पाईकराव, सुशांत गायकवाड व सुनील चक्रनारायण यांना पोलिसांनी सुद्धा केली आहे. गणेश गायकवाड अद्याप सापडलेला नाही.
Crime News
मृत आमीर शेख याचे त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्या दोघांची कुटुंबे रांधे गावात बऱ्याच वर्षांपासून एकमेकांच्या शेजारी राहत होती. दोन्ही कुटुंबात चांगले संबंध सुद्धा होते. मात्र, आमीरने त्यांच्या मुलीशी लग्न केल्याने दोन्ही कुटुंब एकमेकांचे कट्टर विरोधक बनले. आमीर शेख व त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या तरुणीने ४ महिन्यांपूर्वी कोणाला काही कळू न देता आळंदीत आंतरधर्मीय विवाह केला होता आणि नंतर मोशी येथे संसार थाटला होता. आमीर हा एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. बहिणीने मुस्लीम तरूणाशी विवाह केल्याच्या रागातून तिच्या भावाने आपला दुसरा मेहुणा व अन्य एका नातेवाईकांच्या मदतीने १५ जून रोजी आमीरचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह आळंदी-चाकण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी झुडपांत नेऊन जाळला. आमीरच्या पत्नीने आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार भोसरीत दिल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. आमीरशी लग्न करणाऱ्या तरूणीच्या भावाला व अन्य नातेवाईकांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली, तेव्हा कुठे खुनाचा उलगडा झाला.