अमळनेर तालुक्यात तरूण शेतकऱ्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या १२ जणांवर गुन्हा दाखल !
जळगाव टुडे । अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील तरूण शेतकरी अतूल पाटील यांनी हेंकळवाडी शिवारातील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी मयत शेतकऱ्याची पत्नी जयश्री पाटील यांच्या तक्रारीवरून एकूण १२ जणांच्या विरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित सर्वांवर अतूल पाटील यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ( Crime News )
जयश्री अतूल पाटील यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे सासरे ज्ञानेश्वर शेनफडू पाटील यांनी जवखेडे गावातील मिलिंद अविनाश पाटील यांच्याकडून टप्प्याटप्याने पैसे घेतले होते. या पैशांचे व्याज दरवर्षी फेडले देखील होते. त्यानंतरही मिलिंद पाटील यांनी ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे सुमारे ६ लाख मुद्दल आणि २ लाख रूपये व्याज, अशा एकूण ८ लाख रूपयांची मागणी केली होती. त्याबदल्यात मिलिंद पाटील यांनी जवखेडा शिवारातील ज्ञानेश्वर पाटील यांची दोन बिघे शेतजमीन नावावर सुद्धा करून घेतली होती.
दरम्यान, तक्रारदार जयश्री पाटील यांचे पती अतूल पाटील हेच शेती कसत होते. मात्र, यावर्षी व्याजाचे पैसे परत केले नाही म्हणून मिलिंद पाटील तसेच त्यांचे वडील अविनाश पाटील यांनी अतूल पाटील व त्यांच्या पत्नीला शेतात पाय ठेवू दिला नाही. व्याजाचे पैसे द्या मगच शेतात या, असे सांगून मारहाण केली. शिवाय त्यांनी लागवड केलेल्या कापसाच्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला. मिलिंद पाटील यांच्या त्रासाला त्यामुळे अतूल पाटील हे खूपच कंटाळले होते. त्यातूनच त्यांनी हेंकळवाडी शिवारातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.
पोलिसात यांच्यावर दाखल झाला आहे गुन्हा
मिलिंद पाटील तसेच त्यांचे वडील अविनाश पाटील, त्यांची आई व पत्नी, सुरेश यशवंत पाटील, ललिता सुरेश पाटील, ईश्वर यशवंत पाटील, सुरेखा ईश्वर पाटील, नेत्रपाल ईश्वर पाटील, मोनू ईश्वर पाटील, पप्पू सुरेश पाटील (सर्व रा. जवखेडा), बबलू कळवणकर (रा.कळवण) यांनी अतूल पाटील यांचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे जयश्री पाटील यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे.