बाबा आमटेंच्या आश्रमात तरूणीची हत्या करणाऱ्या चोपड्याच्या तरूणाने स्वतः घेतला गळफास !

जळगाव टुडे । चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे असलेल्या बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमात एका तरूणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना २६ जून २०२४ रोजी घडली होती. प्रेमसंबंधात धोका दिल्याच्या कारणावरून तरूणीचा खून करणारा संशयित आरोपी समाधान कोळी (वय २५, रा.चोपडा, जि.जळगाव) याला पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र, त्याने पोलिसांची नजर चुकवून कोठडीतील बाथरूममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार आता उघडकीस आला आहे. ( Crime News )

बाबा आमटेंच्या आश्रमात आरती दिगंबर चंद्रवंशी (वय २४) ही तरूणी आई-वडिलांसह वास्तव्यास होती. त्याच ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील चोपड्याचा तरूण समाधान कोळी हा उपचारासाठी गेलेला होता. समाधान हा उपचार घेत असतानाच केअर टेकरचे काम देखील करत होता. दरम्यान, तिथे आरतीचे व त्याचे प्रेमसंबंध सुरू झाले. मात्र, साधारण सहा महिन्यानंतर आरतीने समाधानची साथ सोडून अन्य दुसऱ्यावर प्रेम करणे सुरू केले. त्याच रागातून समाधानने आरतीवर चाकू हल्ला केल्याचा आरोप होता आणि वरोरा पोलिसांनी त्याला तातडीने अटक सुद्धा केली होती.

प्राप्त माहितीनुसार, आरतीच्या हत्येचा आरोप असलेल्या समाधान कोळी याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. याशिवाय समाधानवर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल होता. त्यामुळे तो अटक झाल्यापासून प्रचंड नैराश्यात होता. मानसिकता बिघडलेली असल्याने अखेर रविवारी (ता.३०) त्याने पोलिस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वतःच्या बुटाची लेस काढून ती बाथरूमच्या खुंटीला अडकवून समाधान कोळी याने फाशी लावून घेतल्याचे पोलिस तपासात आढळले आहे. दरम्यान, समाधान कोळी याच्या आत्महत्येच्या प्रकरणात दोन पोलिसांना निष्काळजीपणाचा ठपका ठेवून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button