राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सरपंचाची गोळी घालून केली हत्या..!

जळगाव टुडे । शरद पवार गटाकडून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेल्या सरपंचाची गोळी घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पैशांच्या वादावरून सदरची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, पोलिसांनी याप्रकरणी एकाच्या विरोधात ३०२ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. ( Crime News )

बापू आंधळे असे गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते बीड जिल्ह्यातील मरळवाडीचे सरपंच होते. मयत आंधळे हे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जायचे. बापू आंधळे यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेत आणखी दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परळीतील बँक कॉलनी परिसरात गोळीबाराची ही घटना घडली आहे. पोलिसांनी बाबू आंधळे यांचा मृतदेह शवविच्छेदसाठी रूग्णालयात पाठवला आहे. त्यांच्यावर एकूण ५ राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

बापू आंधळे यांनी शरद पवार गटाचे बबन गीते यांच्या पॅनेलमधून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते मरळवाडीचे सरपंच देखील बनले होते. मात्र, काही दिवसांनी त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. दरम्यान, बबन गीते आणि बापू आंधळे यांच्यात पैशांवरून वाद झाला. त्याच वादातून बापू आंधळे यांच्यावर बबन गीते यांच्याकडून गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गोळीबारात ग्यानबा गीते आणि बबन गीते यांचा सहकारी महादेव गीते हे दोघे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या घटनेने परळीत खळबळ उडाली असून, नागरिक तणावाखाली वावरत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button