अवघ्या नऊ महिन्याच्या बाळाला विष पाजून आईने गळफास घेऊन केली आत्महत्या !

जळगाव टुडे । सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला विष पाजून नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मयत महिलेचा पती व दिराला अटक देखील केली आहे. सदरची खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. ( Crime News )

दरम्यान, आईने विष पाजल्याने अत्यवस्थ झालेल्या स्मित नावाच्या बालकाचे प्राण वाचले असून, त्याच्यावर चंद्रपुरात एका खासगी रूग्णालयात आता उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पल्लवी मितेश पारोधे (वय २७, रा. शेगाव, ता.वरोरा) असे मृत महिलेचे नाव आहे. पल्लवीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी पल्लवीचा पती मितेश पारोधे आणि दीर रितेश पारोधे यांना अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव बुद्रुक (ता.वरोरा) येथे पल्लवीचा पती मितेश पारोधे याचे कृषी केंद्र आहे. दोन वर्षांपूर्वी मितेश आणि पल्लवी यांचे लग्न झाले होते. पल्लवीने पोटच्या नऊ महिन्यांच्या चिमुरड्याला विष पाजून स्वतः घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मात्र, आपल्या मुलीने आत्महत्या केलेली नसून सासरचे लोक तिला पैशांसाठी छळत होते, असा आरोप पल्लवीचे वडील विनोद ढोके यांनी केला आहे. वेळीच घडला प्रकार लक्षात आल्याने नऊ महिन्यांचा स्मित यास चंद्रपुरातील खासगी रूग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button