मुलीला शाळेत आणायला गेलेली जळगावची विवाहिता सापडली शिरसोलीच्या विहिरीत !

जळगाव टुडे । मुलीला शाळेत आणायला गेलेल्या जळगाव शहरातील विवाहितेला अज्ञात महिलेने संमोहित करून शिरसोली येथील विहिरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार आज मंगळवारी (ता. २५) सकाळी उघडकीला आला. सुदैवाने संबंधित विवाहिता बचावली असून तिला शिरसोली ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीच्या बाहेर काढण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू असून पोलिस सविस्तर माहिती घेत आहेत. ( Crime News )

जळगाव शहरातील नेहरूनगर परिसरात वास्तव्यास राहणाऱ्या दीपिका दीपक पाटील (वय २६) ह्या सोमवारी (ता.२४ ) दुपारी एक वाजेनंतर मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, त्यांना रस्त्यावर एक अनोळखी महिला भेटली. त्याच महिलेने विवाहितेच्या डोक्यावरून हात फिरवला व तिची शुद्ध हरपली. त्यानंतर काही वेळाने विवाहितेला गुंगीत असताना आपण एका विहिरीत असल्याचे समजले. मात्र गुंगीच असल्यामुळे त्यांना काहीच हालचाल करता येत नव्हती.

सोमवारची पूर्ण रात्र विवाहितेने त्याच विहिरीत काढली. दुसरीकडे शाळेत मुलीचे पालक तिला घेण्यासाठी आले नाही म्हणून शिक्षकांनी मुलीच्या वडिलांना फोन केला. तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितले की, तिची आई तिला शाळेत घ्यायला गेली आहे. दिवसभर व रात्रभर सदर महिलेचा शोध परिवार घेत होता. दरम्यान शिरसोली येथे मुख्तार मुनाफ कुरेशी हे त्यांच्या आकाशवाणी जवळील शेतातील विहिरीजवळ गेले असता त्यांना सदरहू महिला ही विहिरीत बसलेली दिसून आली.
त्यांनी तात्काळ पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळविले. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला बाहेर काढले. गावातीलच एका तरुणाने तिला ओळखले. त्याच्या मित्राची ती पत्नी असल्यामुळे त्याने त्याच्या मित्राला कळवले. त्यानंतर सदर महिलेला शासकीय वैद्यकीय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून तिच्या नातेवाईकांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button