जळगावची घटना…चुलत भावाने अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढून बहिणीलाच केले ब्लॅकमेल !
जळगाव टुडे । विवाहितेचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ चित्रीत केल्यानंतर त्याआधारे तिच्यावर दोन वर्षे अत्याचार करणाऱ्या चुलत भावासह अन्य दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक आणि बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जळगाव शहरात घडली आहे. समाजाच्या सर्व थरातून त्याचा निषेध देखील केला जात आहे. ( Crime News )
अत्याचाराच्या घटनेतील पीडितेला तीन मुले आहेत. साधारणतः दोन ते अडीच वर्षांपूर्वी लग्नकार्याच्या निमित्ताने तिचे सर्व नातेवाईक एकत्र आले होते. त्याचवेळी चुलतभावाच्या नात्याच्या एकाशी पीडितेची ओळख झाली. त्याने सदर पीडिता अंघोळ करीत असताना व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला होता. त्या व्हिडिओच्या आधारे नंतर त्याने चुलत बहिणीला ब्लॅकमेल करून तिच्याशी शारिरीक संबध प्रस्थापित केले. त्याच्या दोन मित्रांनीही पीडितेवर अत्याचार करून त्रास देणे सुरू केले.
दरम्यान, त्रास सहन न झाल्याने पीडितेने पती व कुटुंबीयाच्या मदतीने हिंमत करून अखेर जळगावच्या एमआयडीसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पीडितेच्या तक्रारीवरून त्यानंतर तिचा चुलत भाऊ सचिन किशोर भाट (रा.नंदुरबार), बंटी नेतलेकर (रा.दोंडायचा), नीलेश तमायचेकर (रा.नंदुरबार) यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, इन्स्टाग्रामवर पीडितेचे अकाउंट असल्याने त्याद्वारे संशयित सचिन भाट हा पीडितेशी संपर्कात होता. त्याच माध्यमातून त्याने तिला ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.