रामदेववाडी कार अपघात; तिन्ही संशयितांना अखेर खंडपीठाकडून मिळाला जामीन !
जळगाव टुडे । तालुक्यातील रामदेववाडी येथे मातेसह तिची दोन बालके व अन्य एका मुलाचा भरधाव कारने चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तिन्ही संशयितांचा जामीन जळगावच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता तसेच विरोधात लावलेले सदोष मणुष्यवधाचे ३०४ कलम योग्य असल्याचा निर्वाळा देखील दिला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील तिन्ही संशयितांना छत्रपती संभाजीनगरातील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आता जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांच्या विरोधात लावलेले कलम चुकीचे ठरविले आहे. ( Crime News )
जळगावच्या जिल्हा न्यायालयात दोनवेळा जामीन नामंजूर झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीतील संशयित अर्णव अभिषेक कौल, अखिलेश संजय पवार आणि ध्रूव नीलेश सोनवणे यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगरातील खंडपीठात जामीनासाठी वेगवेगळे अर्ज दाखल केले होते. खंडपीठात न्यायमूर्ती एस.जे.मेहरे यांच्या कोर्टात तिघांच्या जामीनावर सुनावणी झाली. तेव्हा न्यायमुर्तींनी नोंदविलेल्या मतानुसार, रामदेववाडी गावानजिक घडलेली घटना ही एक अपघात असून, त्यात पोलिसांतर्फे लावण्यात आलेले ३०४ हे कलम नंतर लावण्याची गरज नव्हती. विशेष म्हणजे घटनास्थळी आढळून आलेल्या गांजामध्ये अंमली पदार्थांचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे तिन्ही संशयितांवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन जप्त केले असून, संशयित तरूणांच्या रक्ताचे नमुने सुद्धा घेतले आहेत. प्रत्यक्षात त्यात काहीच आढळलेले नाही. तिन्ही संशयित तरूण आहेत आणि त्यांना उज्ज्वल भविष्य आहे. त्यामुळे त्यांना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करून तिघांचा जामीन खंडपीठाने मंजूर केला आहे. खंडपीठाने जामीन मंजूर केल्यानंतर अर्णव कौल, अखिलेश पवार आणि ध्रूव सोनवणे हे न्यायालयीन कोठडीतून बाहेर पडून त्यांच्या घरी देखील परतले आहेत.