सावधान…कोरोना पुन्हा पाय पसरतोय; महाराष्ट्रातही आढळले 91 नवीन रूग्ण !
जळगाव टुडे । संपूर्ण जगात जवळपास दोन वर्ष उच्छाद मांडणारा कोरोना आता नुसता आठवला तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. मात्र, तोच कोरोना नव्या व्हेरियंटच्या स्वरुपात पुन्हा पाय पसरत असल्याचे दिसून आले आहे. चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातही नवीन कोरोनाचे सुमारे 91 रूग्ण आढळले आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक पुण्यातील रूग्णांचा समावेश आहे. कोरोनाच्या या नवीन प्रकाराला FLiRT असे नाव देण्यात आले आहे. (Corona Virus)
कोविडच्या नवीन प्रकाराने अमेरिकेसह सिंगापूरमध्ये सध्याच्या स्थितीत जास्त कहर केला आहे. आता या कोरोनाच्या नवीन प्रकाराने भारत देशातही पाय पसरायला सुरुवात केली आहे. प्राप्त माहितीनुसार FLiRT कोरोनाचे भारतात आतापर्यंत 250 रूग्ण सापडले आहेत. 15 मे पर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार, या नवीन प्रकारातील कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये पुण्यातील सर्वाधिक 51 रूग्णांचा समावेश असून, 20 रूग्णांच्या संख्येसह ठाणे दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही प्रत्येकी सात रूग्ण आढळल्याची माहिती मिळाली आहे.
यूएस आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या या नवीन प्रकाराची लागण वेगाने होत आहे. वाढत्या संसर्गामुळे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा सर्व लोकांना मास्क घालण्याचे आवाहन देखील केले आहे. कोरोनाचे हे रूप ओमिक्रॉनसारखे आहे, जे लोकांना वेगाने संक्रमित करू शकते. याशिवाय हा प्रकार लसीकरणामुळे निर्माण होणारी शरीराची प्रतिकारशक्ती कमी करण्यातही यशस्वी होत असल्याचे दिसून आले आहे.