Congress Party : काँग्रेसच्या ‘त्या’ आमदारांमध्ये रावेरचे आमदार शिरीष चौधरी नाहीत !
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले स्पष्टीकरण
Congress Party : विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केले म्हणून सात आमदारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. दरम्यान, त्या वादग्रस्त आमदारांमध्ये रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांचाही समावेश असल्याची चर्चा ऐकण्यात आली होती. मात्र, त्या आमदारांमध्ये शिरीष चौधरी यांचा समावेश नसल्याचे स्पष्टीकरण आता खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. त्यामुळे चौधरी समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Congress Party : Shirish Choudhary of Raver is not among the ‘those’ Congress MLAs to be expelled!
विधान परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसच्या आमदारांनी महायुतीला क्रॉस वोटिंग केल्याच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका देखील मांडली होती. विधान परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी महायुतीला क्रॉस वोटिंग केले आणि त्यात माझा समावेश आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. परंतू माझ्या परिवाराची माझ्या जन्मापुर्वीपासून काँग्रेसशी नाळ जुळलेली आहे. गद्दारी आणि फितुरी हे आमच्या रक्तात नाही. माझी बदनामी करण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी फुटलेल्या आमदारांची नावे आधी जाहीर करावी. सत्य काय ते जनतेसमोर येईल, असेही आमदार शिरीष चौधरी म्हटले होते.
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची नावे स्पष्ट झाली आहेत. त्यांच्या नावाचा अहवाल दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाच्या त्या सात आमदारांमध्ये रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांचे नाव नसल्याचे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी प्रदेश बैठकीत स्वतः दिले आहे. त्यामुळे आमदार चौधरी समर्थकांचा जीव भांड्यात पडला असून, सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.