CMO Maharashtra : मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ? मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी…!

CMO Maharashtra : विधानसभेची निवडणूक अद्याप घोषीत देखील झालेली नाही, तितक्यात महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदे सेना तसेच अजित पवार गटाने तर बॅनर झळकावून पुढील मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपलाच नेता असेल, असा दावा करून टाकला आहे. तशात भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण आहे, याविषयी थेट वक्तव्य केल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

CMO Maharashtra: Who is the face of the post of Chief Minister? Minister Girish Mahajan’s statement sparked controversy in the Grand Alliance…!

विधानसभा निवडणूक जवळ येत असताना महायुतीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून गोंधळ सुरू आहे. अजित पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकल्याने चर्चेला नुकतेच उधाण आले होते. अनेक ठिकाणी त्यांची छायाचित्रे मुख्यमंत्रीपदाचा दावा करताना दिसली, ज्यामुळे युतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असले तरी, त्यांची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रीपदासाठी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचा चेहरा असल्याचा ठाम दावा त्यांच्या समर्थकांनी देखील केला आहे. सध्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत असलेले एकनाथ शिंदे हे युतीत आपले स्थान मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या गटातील काही नेते देखील शिंदेंच्या नेतृत्त्वातच आगामी निवडणुका लढवाव्यात, असा आग्रह धरत आहेत.

महायुतीतील रस्सीखेच महाविकास आघाडीसाठी संधी ठरू शकते

तिसरीकडे भाजपमधील वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी उघडपणे देवेंद्र फडणवीस हेच त्यांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले आहे. ज्यांनी राज्यात यापूर्वी यशस्वीरित्या पाच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते, तेच फडणवीस अजूनही पक्षातील अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत. महाजनांच्या विधानामुळे महायुतीत आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. महायुतीच्या या अंतर्गत मतभेदांमुळे निवडणुकीच्या तोंडावर युती कोणत्या चेहऱ्यावर मते मागणार, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विरोधी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत अजून तरी सस्पेन्स कायम ठेवला आहे. महायुतीतील मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच महाविकास आघाडीसाठी एक संधी ठरू शकते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button