CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी भरपूर पाऊस आणि शेतकऱ्यांच्या सुखासाठी विठ्ठलाकडे केली मनोभावे प्रार्थना !
CM Eknath Shinde : वारकरी सांप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील सुमारे १२ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. दरम्यान, आजच्या आषाढी एकदशीच्या दिवशी पहाटे दोनच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लताताई शिंदे यांच्यासह शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भरपूर पाऊस आणि शेतकऱ्यांच्या सुखासाठी विठ्ठलाकडे मनोभावे प्रार्थना देखील केली. भाविकांची अलोट गर्दी, टाळ मृदुंग व भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली.
CM Eknath Shinde : Chief Minister prayed to Vitthal for abundant rain and happiness of farmers!
गेल्या काही दिवसांपासून दिंड्या-पताका घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. दुसऱ्या बाजूला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा देखील संपन्न झाली आहे. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथील रहिवासी असून, ते गेल्या १६ वर्षांपासून अखंडपणे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत आहेत. राज्यातील वारकरी व शेतकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, पिक चांगले येऊ दे, बळीराजाला सुखी-समाधानी राहू दे, असे साकडे आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना सांगितले.
दरम्यान, तिरुपती बालाजी तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर पंढरपुरातही टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येईल. यामुळे पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना विठुरायाचे सुलभ आणि कमीत कमी वेळेत पदस्पर्श दर्शन घेता येईल. यासाठी राज्य सरकारकडून सुमारे १०३ कोटी रुपयांचा निधी लवकरच देईल, अशीही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापूजा संपन्न झाल्यावर मंदिराच्या सभा मंडळात झालेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात केली.