छगन भुजबळांचे दुःख….शरद पवारांसोबत गेलो आणि आयुष्याचे नुकसान करून बसलो !
जळगाव टुडे । ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत मोठा गौप्यस्फोट केला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेषतः “सन 2004 मध्ये छगन भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिले असते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असती,” असे वक्तव्य पवारांनी केले आहे. दरम्यान, छगन भुजबळांनीही प्रत्त्युरादाखल “शरद पवारांसोबत गेलो आणि मुख्यमंत्रीपदाला मुकलो. काँग्रेसकडून मला त्यावेळी चांगली मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Chhagan Bujbal)
“सन 1991 मध्ये मी शिवसेना सोडून काँग्रसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात काम केले म्हणून माझ्या घरावर अनेक हल्ले झाले होते. सन 1995 ला भाजपा व शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आले तेव्हा मी विधान परिषदेवर आमदार देखील होतो तसेच विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केले. दरम्यानच्या काळात 1999 मध्ये शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. शरद पवार यांच्यासोबत कोणीच नव्हते तेव्हा मी त्यांची साथ दिली. मला काँग्रेसवाले सांगायचे की शरद पवार यांच्यासोबत जाऊ नका, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ. मात्र मी शरद पवार यांची साथ दिली,” असेही छगन भुजबळ म्हणाले आहे.
मला उपमुख्यमंत्री केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कशी काय फूट पडली नाही ?
काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होता. मात्र, शरद पवार त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी आपल्याकडे सक्षम उमेदवार नाही म्हणून तयार नव्हते. त्यावेळी मला मुख्यमंत्रीपद देण्यासाठी काँग्रेसचे नेते देखील अनुकूल होते. पण शरद पवारांनी वेळीच नाव न सुचवल्याने मुख्यमंत्रीपदाची आयती संधी त्यावेळी हुकल्याचीही खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. तसेच मी मुख्यमंत्री बनल्यावर पडणार होती, तशी फूट मला उपमुख्यमंत्री केल्यानंतर राष्ट्रवादीत कशी काय पडली नाही, असाही प्रश्न भुजबळांनी शरद पवारांच्या वक्तव्यानंतर उपस्थित केला आहे.