चाळीसगावचे राजकारण मुद्द्यांवरून पोहोचले थेट गुद्द्यांवर !

आमदार मंगेश चव्हाणांना गोळी घालण्याची जाहीर धमकी; भाजपचा आरोप

जळगाव टुडे । चाळीसगाव शहरात लोकसभा निवडणुकीपासून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतच होत्या. त्यानंतर आता दोघांमधील राजकीय वाद मुद्द्यांवरून थेट गुद्द्यांवर आला असून, महाविकास आघाडीच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने आमदार मंगेश चव्हाण यांना पिस्तुलीने गोळी घालण्याची जाहीर धमकी दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यात चांगलीच खळबळ देखील उडाली आहे. ( Chalisgaon News )

महाविकास आघाडीतर्फे चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शहर पोलिस ठाण्यासमोर नुकतेच एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्याठिकाणी व्यासपीठावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख व इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने आमदार मंगेश चव्हाण यांना उद्देशून बोलताना त्यांना पिस्तुलीने गोळी घालेन, असे खळबळजनक वक्तव्य केले. त्यामुळेच आता मोठे वादंग उठले आहे. संबंधित पदाधिकारी पिस्तुलीने मारण्याची भाषा करत असताना, व्यासपीठावरील कोणीच त्यांना थांबवले नाही. उलट सर्वजण त्यांना हसून दाद होते, असेही भाजपने म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे सर्व विरोधक एकवटले होते. सर्व क्लुप्त्या व युक्त्या वापरून देखील त्यांना तालुक्यातून मताधिक्य देता आले नाही विधानसभेत आजच त्यांना पराभव दिसत असल्याने आमदार मंगेश चव्हाण यांना विचलित करण्यासाठी व तालुक्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालवल्याचा आरोप आता महायुतीच्या नेत्यांकडून होत आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र सदरचे धरणे आंदोलन हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होते की फक्त आमदार मंगेश चव्हाण यांना विरोध म्हणून होते, असाही सवाल भाजपने उपस्थित केला आहे. तसेच गोळी घालण्याची भाषा करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button