चाळीसगाव तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार, शेतकऱ्यांना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला धीर

Chalisgaon News : चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड परिसरात काही दिवसांपासून बिबट्या व त्याचे बछडे यांचा वावर आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पिलखोडला जाऊन शेतकरी व गावकऱ्यांची भेट घेतली. तसेच वनविभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी व उप वनसंरक्षक जळगाव प्रादेशिक यांना फोन करून या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या. पकडलेला बिबट्या सुरक्षित स्थळी वनहद्दीत सोडण्याच्या बाबतीतही त्यांनी वन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

चाळीसगाव तालुक्यात सुमारे सहा वर्षांपूर्वी सन 2017 मध्ये नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घालत सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करणे टाकले होते. नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने व्यापक मोहिम हाती घेतल्यानंतरही तोंडाला मानवी रक्त लागलेला बिबट्या सहजासहजी हाती लागला नव्हता. आताही पिलखोड परिसरात बिबट्या आणि त्यासोबतच्या बछडे यांचा मुक्त संचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेती शिवारात बिबट्याच्या पाऊल खुणा दिसून आल्यानंतर शेतकरी व मजूर वर्ग कमालीचे धास्तावले आहेत. निर्जन शेती शिवारात जाताना अनेकजण मागे पुढे करू लागले आहेत. बिबट्याने अद्याप कोणाला इजा पोहोचवलेली नाही. पण त्याच्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा पाहुनच बहुतेकांची पाचावर धारणा बसली आहे. संबंधितांना आमदार मंगेश चव्हाण यांनी धीर देऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button