सात दिवसात आरटीओ कार्यालय सुरु करून दाखवले, अशक्य शब्द आमदार मंगेश चव्हाण यांना माहित नाही – मंत्री गिरीश महाजन
Chalisgaon News : “उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कार्यालय चाळीसगाव येथे होणं सोपे नाही. आमदार मंगेश चव्हाण हे कोणतेही काम हाती घेतल्यावर पूर्ण करतात. ते तालुक्याचा विकास करीत असून, सतत पाठपुरावा करून त्यांनी RTO कार्यालयाचे काम मंजूर करून आणले. दूरदृष्टी असलेला आमदार, नेता तालुक्याला मिळाला आहे. अशक्य हा शब्द आमदार मंगेश चव्हाण यांना माहित नाही”, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या महात्मा फुले कॉलनीतील शहीद हेमंत जोशी क्रीडांगणावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कार्यालय व नवीन वाहनांच्या MH 52 नोंदणी शुभारंभासह विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन गुरुवारी (ता.07) चाळीसगाव येथे पार पडले. त्याप्रसंगी मंत्री श्री. महाजन बोलत होते. सदरच्या दिमाखदार सोहळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ, शेंदुर्णी येथील संजयदादा गरुड, जिल्हा दूध संघ संचालक रोहित निकम, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार, मधुभाऊ काटे, अमोल नाना पाटील यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, दळवळण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने मंत्री महोदय व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन वाहन धारकांना MH52 क्रमांकाची पासिंग नोंदणी देण्यात आली.
मंत्री गिरीशभाऊ महाजन म्हणाले की, “मोदी सरकारमध्ये सर्व कामे होत आहेत. देश सुसाट सुटलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय फक्त 7 दिवसात सुरु करून नूतन कार्यालयासाठी 40 कोटी रुपये देखील मंजूर करून घेतले आहेत. चाळीसगाव तालुक्यात मंगेश चव्हाण यांनी जनतेसाठी सर्वच कार्यालये केली आहेत. आता फक्त विमानतळ आणणे बाकी आहे, असे कौतुक देखील त्यांनी आमदार श्री. चव्हाण यांचे केले. मी गेली 6 टर्म आमदार म्हणून निवडून आलो, तुमच्या कडून देखील मला हिच अपेक्षा आहे.”
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतुक केले. ते म्हणाले की “चाळीसगाव व भडगाव येथे MH 52/MH54 हे RTO कार्यालय झाले. आमदार किशोर पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांची कामे चांगली आहेत. चाळीसगावच्या कार्यालयामुळे जवळपास 120 किलोमीटरचे अंतर कमी होवून अपघाताचे प्रमाण देखील कमी होणार आहे. चाळीसगावची MH 52 ही दुसरी ओळख झाली आहे आमदार म्हणून दमदार काम मंगेश दादांनी केले. चाळीसगाव तालुक्यासाठी निधी कमी पडू देणार नाही.”
चाळीसगावचे RTOकार्यालय चाळीसगाव वासीयांना अर्पण
“आज चाळीसगाव तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण असून राज्यात नव्हे तर देशभरात MH52 ही आपली वेगळी ओळख निर्माण होणार आहे. भारतीय जनता पक्षाने संधी दिली, ना.गिरीशभाऊ महाजन यांनी विश्वास दाखवला आणि चाळीसगाव तालुक्याच्या जनतेने आशिर्वाद दिले म्हणून मी हे काम करू शकत आहे. त्यामुळे MH52 चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाव वासीयांना नम्रपणे अर्पण करत आहे. राज्यात गेल्या 13 वर्षात कुठेच RTO कार्यालय मंजूर झाले नाही. प्रशासकीय स्तरावर एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी प्रचंड पाठपुरावा करावा लागतो. ना.गिरीशभाऊंचे आशिर्वाद तसेच महायुती सरकार यामुळेच हे कार्यालय मंजूर करणे शक्य झाले. चाळीसगाव तालुक्यात जवळपास सव्वालाख वाहने आहेत. या वाहनांचे पासिंग, फिटनेस आदी कामासाठी जवळपास 120 किमी जळगांव येथे जावे लागत होते. ते आता होणार नसून सर्व कामे चाळीसगाव येथे होणार आहेत. तसेच सदर मैदानावरील कार्यालय तात्पुरते असून नवीन कार्यालय बांधकामासाठी बिलाखेड येथील शासकीय जागेची मागणी केली आहे व इमारत बांधकामाचा 37 कोटींचा प्रस्ताव देखील पाठवला आहे”, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी नमूद केले.
पदापेक्षा कामात जास्त विश्वास ठेवणारा कार्यकर्ता
यासोबतच चाळीसगाव तालुक्यात आज एकाच वेळी चाळीसगाव शहरातील महापुराचे प्रमुख कारण असलेल्या हॉटेल दयानंद जवळील तितुर नदीवरील नवीन पुलाचे भूमिपूजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या मोदी आवास योजनेतील भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गासाठीच्या महाराष्ट्रातील पहिल्या 259 घरांच्या वसाहतीचे बोढरे येथे भूमिपूजन, तालुका क्रीडा संकुल येथे नूतनीकरण व अद्ययावतीकरण आदी कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चाळीसगाव तालुक्यातील 2021 मधील महापूरग्रस्तांना ६ कोटींची मदत मिळाली असून दुष्काळग्रस्तांसाठी 133 कोटी 23 लाख रुपये मंजूर झाले आहेत, लवकरच ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका व तिसऱ्या क्रमांकाचे शहर मात्र साधी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत नव्हती, नाट्यगृह नव्हते, आज चाळीसगाव शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पंचायत समिती, कोर्ट, उत्पादन शुल्क, नाट्यगृह, रेस्ट हाउस, पोलीस हौसिंग आदी इमारतींचे काम सुरु असून व काही काम पूर्ण देखील झाले आहेत. पदापेक्षा कामात जास्त विश्वास ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. चाळीसगाव तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे देखील आमदार चव्हाण यांनी सांगितले.