धुळे जिल्ह्यातील बारीपाड्याचे चैत्राम पवार पहिल्या वनभूषण पुरस्काराचे मानकरी
Chaitram Pawar : वन संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले धुळे जिल्ह्यातील बारीपाडा (ता. पिंपळनेर) येथील चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 20 लाख रूपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सदरचा पुरस्कार श्री. पवार यांना चंद्रपुरच्या ताडोबा महोत्सवात 3 मार्चला प्रदान केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यात वन, वानिकी आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्याचा निर्णय शासनाने 5 फेब्रुवारी 2024 रोजी घेतला होता. त्यानुसार सन 2024 च्या पहिल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्कारासाठी बारीपाड्याचे चैत्राम पवार यांची निवड झाली आहे. गेल्या 26 वर्षांपासून चैत्राम पवार यांनी आदिवासी बांधवांना सोबत घेऊन नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, सक्षमीकरण, स्वावलंबन, वनहक्क कायदा, शेती विकासावर भर दिला आहे. जंगलात सापडणाऱ्या नैसर्गिक रानभाज्यांचा महोत्सव भरविण्यातही त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील 100 गावांमध्ये आतापर्यंत परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन यापूर्वी शासनासह अनेक संस्थांकडून त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकिर्दीतील महाराष्ट्र वनभूषण हा सर्वोच्च पुरस्कार मानला जात आहे.