थांबा….मध्य रेल्वेचा तीन दिवसांचा मेगा ब्लॉक; 72 एक्स्प्रेस व 956 लोकल गाड्या रद्द !
जळगाव टुडे । मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्लॅटफॉर्मचा विस्तार तसेच रुंदीकरणासाठी 30 मे पासून 3 जून 2024 दरम्यान तीन दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. गुरुवारी रात्रीपासूनच मेगा ब्लॉक लागू झाला असून, लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचे मेगा ब्लॉकमुळे हाल होणार आहेत. याशिवाय पुणे, दादर, पणवेल आणि नाशिक मार्गावरील लांब पल्ल्याच्या 72 मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. (Central Railway)
मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणासाठी 63 तासांचा मेगाब्लॉक गुरुवारी मध्यरात्रीपासून घेण्यात आला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 च्या कामांसाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून 36 तासांचा ब्लॉक सुरू होईल. मुख्य आणि हार्बर मार्गावरील 72 मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि 956 मुंबई लोकल गाड्या शुक्रवार ते रविवार या कालावधीत त्यामुळे रद्द केल्या जातील. वडाळा, दादर, पुणे, पनवेल आणि नाशिक येथून अनेक मेल-एक्स्प्रेस आणि मुंबई लोकल गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड आणि शॉर्ट-रूट केल्या जाणार आहेत.
मेगा ब्लॉकमुळे लोकल गाड्या व मेल रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील सर्व आस्थापनांना तुमच्या कर्मचाऱ्यांना या काळात घरून किंवा इतर कोणत्याही मार्गाने काम करण्याची संधी देण्याचे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी केले आहे. रेल्वेने बेस्ट आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची विनंती देखील केली आहे.